(संगमेश्वर / प्रतिनिधी)
ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबतच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. विविध प्रकारे सायबर भामटे ग्राहकांची फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जनता सहकारी बँक, पुणे, शाखा संगमेश्वरतर्फे ग्राहक जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा २० ऑगस्ट रोजी माभळे, भिडे वाडी येथील इंद्रधनू हॉलमध्ये सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या मेळाव्यात सायबर फ्रॉडचे विविध प्रकार, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच सायबर फसवणूक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अनेकदा योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ग्राहक सायबर फसवणुकीचे बळी ठरतात. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, ऑनलाइन व्यवहार करणारे ग्राहक तसेच आगामी काळात बँकेत नवीन खाते उघडू इच्छिणाऱ्या तरुणांनी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शाखाधिकारी विश्वास आठवले यांनी केले आहे.
“जागरूकता हीच सुरक्षा आणि ग्राहकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता,” असे शाखाधिकारी विश्वास आठवले यांनी सांगितले.
बँकेच्या ग्राहकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनता सहकारी बँक, संगमेश्वर शाखेतर्फे करण्यात आले आहे.

