(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दागिने आणि पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या संगिता अशोक धुमाळ यांच्या आमरण उपोषणाची अखेर नाटे पोलिसांनी दखल घेतली. नाटे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी धुमाळ यांना लेखी पत्र देत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून दागिने आणि पैसे परत मिळावेत यासाठी धुमाळ यांचा पाठपुरावा सुरू होता. पोलीस ठाणे, तंटामुक्तीची प्रक्रिया आणि त्यानंतर नोटरीच्या माध्यमातून संबंधितांकडून आश्वासने घेण्यात आली. मात्र, आश्वासनांची मुदत संपूनही प्रत्यक्षात दागिने आणि पैसे परत मिळाले नसल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. दुमाळ यांच्या तक्रारीवर आश्वासनांची मलमपट्टी झाली मात्र प्रत्यक्ष न्यायासाठी उपोषणाची वेळ आली! या प्रकारामुळे नाटे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. वारंवार आश्वासने देऊनही प्रश्न सुटत नसेल, तर तक्रारदाराला न्याय मिळवून देण्याची यंत्रणेची जबाबदारी नेमकी कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत होता.
दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उपोषणाची दखल घेत नाटे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी उपोषणस्थळी भेट देत धुमाळ यांना पत्र दिले. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर धुमाळ यांनी तूर्तास उपोषण स्थगित केले आहे. मात्र, या आश्वासनावर धुमाळ यांनी पूर्ण समाधान व्यक्त केलेले नाही. “आता दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरले नाही आणि आम्हाला न्याय मिळाला नाही, तर २ ऑक्टोबर रोजी आत्मदहन करू,” असा गंभीर इशारा त्यांनी 24 न्यूजशी बोलताना दिला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता केवळ आश्वासन देण्याचे नव्हे, तर त्या आश्वासनाची वेळेत आणि कायदेशीर पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आहे.
आत्मदहनाचे सूर पाहताच पुन्हा एकदा तक्रारदार महिला प्रशासनाच्या दारात आंदोलन करताना दिसण्याची शक्यता आहे. उपोषण स्थगित झाले आहे; संघर्ष मात्र संपलेला नाही. असे चित्र पाहायला मिळत आहे. आता नाटे पोलीस संबंधितांविरोधात नेमकी कायदेशीर कारवाई करतात आणि धुमाळ यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन किती तत्परता दाखवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

