(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र आणि मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफेचे संस्थापक कै. डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता चाफे महाविद्यालयात विविध नावीन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड, जाकादेवी आणि काजुर्ली येथील प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना आणि कौशल्यांना वाव देण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भाषण, सूत्रसंचलन, पुस्तक परीक्षण, संविधान उद्देशिकेचे प्रतिज्ञा पाठांतर, मराठी हस्ताक्षर, चित्रकला, वादन, एकपात्री अभिनय, वादविवाद, सामान्य ज्ञान, घोषवाक्य, चारोळी आणि कविता वाचन अशा विविध विषयांचा समावेश आहे.
डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन, मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्था, मालगुंड तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी, मालगुंड यांच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसह स्पर्धक आणि परीक्षकांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशनचे कार्याध्यक्ष तथा युवा नेते रोहित मयेकर यांनी केले आहे.
डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांसह हितचिंतक तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


