(राजापूर / तुषार पाचलकर)
कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. गणेश कृष्णा वरेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.
कारवली गावची ग्रामसभा २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. नवनियुक्त प्रशासक श्री. विश्वनाथ डवरी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे कामकाज पार पडले. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी श्री. गणेश कृष्णा वरेकर यांच्या नावाची सूचना श्री. नारायण पांचाळ यांनी केली. त्यास सौ. स्मिता उदय साळवी यांनी पाठिंबा दर्शविला. अन्य कोणाचेही नाव पुढे न आल्याने गणेश वरेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
गणेश वरेकर यापूर्वीही तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी कारवली गावाचे सरपंचपदही भूषविले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या वरेकर यांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क असून, वेळेवर उपलब्ध होणे, मदतीसाठी पुढाकार घेणे आणि सहकार्य करणे या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते गावात परिचित आहेत.
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल गणेश वरेकर यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


