(रत्नागिरी / वार्ताहर)
एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड काढलेल्या प्रवाशांना आता कार्ड मिळवण्यासाठीही अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. कार्ड काढताना एकदा रांगेत उभे राहिल्यानंतरही प्रश्न संपत नसून, कार्ड तयार झाल्यानंतर ते घेण्यासाठी त्या महिला प्रवाशांना पुन्हा तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. कार्ड काढताना लागलेल्या वेळेच्या तब्बल चार पट वेळ कार्ड मिळवण्यासाठी लागत असल्याने एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कार्ड काढताना प्रवाशांना सिस्टममधून आलेली पावती देण्यात आली होती. मात्र, आता कार्ड घेण्यासाठी हीच पावती दाखवावी लागत असताना अनेक पावत्यांवरील अक्षरेच गायब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावतीवरून कार्ड शोधताना आणखी गोंधळ निर्माण होत आहे. त्यातच तयार झालेली कार्डे वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याने प्रत्येक प्रवाशाचे कार्ड शोधताना एजन्सी धारकाचीही अक्षरशः दमछाक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एसटी महामंडळाच्या बस प्रवासात महिलांना मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड घेण्याची लगबग सुरू असतानाच आज, १ ऑक्टोबरपासून कार्ड नसलेल्या महिला प्रवाशांना पूर्ण तिकीट आकारले जात असल्याने एसटी स्थानकांवर महिलांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सवलतीचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कार्ड घेणे आवश्यक झाल्याने महिला प्रवाशांनी आज सकाळपासूनच कार्ड केंद्रांवर मोठ्या संख्येने गर्दी केली. आजपासून कार्ड नसलेल्या महिलांना पूर्ण तिकीट द्यावे लागत असल्याने सवलतीचा लाभ घेण्यासाठी कार्ड मिळवणे अत्यावश्यक झाले आहे.
कार्ड काढताना रांग आणि कार्ड घेण्यासाठी पुन्हा त्याहून मोठी रांग
एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी सकाळपासून प्रवाशांची गर्दी होत आहे. अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवासी हातात पावती घेऊन आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, बराच वेळ रांगेत उभे राहूनही प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने प्रवाशांचा संयम सुटत आहे. ‘कार्ड काढताना जेवढा वेळ रांगेत उभे राहावे लागले, त्याच्या चार पट वेळ आता कार्ड घेण्यासाठी लागत आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
अर्धा दिवस झाला, तरी नंबर येईना!
सकाळपासून रांगेत उभे राहिल्यानंतरही अर्धा दिवस उलटला तरी अनेक प्रवाशांचा नंबर आलेला नसल्याचे चित्र आहे. हातातील पावती घेऊन महिला प्रवासी ताटकळत उभ्या आहेत. बराच वेळ उभे राहूनही कार्ड मिळत नसल्याने काही प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचा वेळ या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात जात आहे.
वेगवेगळ्या बॉक्समधील कार्ड शोधण्यातच वेळ जातोय
तयार झालेली कार्डे एकाच पद्धतीने क्रमवारी लावून किंवा व्यवस्थित वर्गीकरण करून ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याने कार्ड शोधण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. पावतीवरील अक्षरे स्पष्ट नसतील तर संबंधित कार्ड शोधण्यासाठी आणखी वेळ लागत आहे. परिणामी एकेका प्रवाशामागे लागणारा वेळ वाढत असून त्याचा थेट परिणाम रांगेतील नागरिकांवर होत आहे.
शून्य नियोजनाचा फटका प्रवाशांना
एनसीएमसी कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू करताना मोठ्या संख्येने प्रवासी कार्ड घेण्यासाठी येणार हे अपेक्षित असतानाही त्यानुसार नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. कार्ड वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था, पुरेसे मनुष्यबळ, कार्डांची व्यवस्थित वर्गवारी आणि होणाऱ्या गर्दीचे नियोजन याचा अभाव असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे दिसत आहे.
प्रवाशांनी कार्ड काढण्यासाठी एकदा वेळ दिल्यानंतर कार्ड तयार झाल्यावर ते घेण्यासाठी पुन्हा एवढा वेळ खर्च करावा लागत असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणाच्या सोयीसाठी आहे, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
महिला प्रवाशांचा संताप; प्रशासनाच्या नावाने व्यक्त केला राग
रांगेत मोठ्या संख्येने ज्येष्ठ महिला प्रवासीही उभ्या असून, बराच वेळ प्रतीक्षा करूनही प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. ‘सवलतीचा लाभ देण्यासाठी कार्डची व्यवस्था केली; मात्र हे कार्ड मिळवण्यासाठीच नागरिकांना एवढा त्रास सहन करावा लागत असेल तर नियोजनाचा नेमका उपयोग काय?’ असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी व्यवस्था असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात कार्ड काढणे, पावती सांभाळणे, पुन्हा रांगेत उभे राहणे आणि त्यानंतर वेगवेगळ्या बॉक्समधून कार्ड शोधण्याची वेळ येत असेल, तर ही संपूर्ण प्रक्रिया प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
प्रवाशांची ससेहोलपट; एसटी प्रशासनाने तातडीने नियोजन सुधारण्याची गरज
एनसीएमसी कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने प्रभावी व्यवस्था करावी, कार्डांची व्यवस्थित क्रमवारी लावावी, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि प्रवाशांना पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी केलेला वेळ आणि खर्च लक्षात घेता, कार्ड वितरणाच्या नावाखाली त्यांची आणखी ससेहोलपट होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्ड वितरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किंवा किमान एक आठवडा सवलतीचा लाभ पूर्ववत ठेवावा, अशी मागणी महिला प्रवाशांकडून केली जात आहे.


