(संगमेश्वर / एजाज पटेल)
नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो, याची जाणीव करून देणारी हृदयद्रावक घटना भांडुप येथे घडली. संगमेश्वर तालुक्यातील उक्षी-बनाचीवाडी हे माहेर आणि कोंडये हे सासर असलेल्या छाया चंद्रकांत सुवरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले. अवघ्या चार वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर दोन मुलींच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या छायाताईंवरही काळाने झडप घातली. त्यांच्या निधनाने दोन्ही मुलींच्या आयुष्यातील आई-वडिलांचे छत्र अल्पावधीतच हरपले.
चार वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपले, आईने सांभाळले कुटुंब
चार वर्षांपूर्वी शिक्षण घेत असतानाच दोन्ही मुलींनी वडिलांचे छत्र गमावले. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने परिस्थिती अत्यंत कठीण झाली. मात्र, छायाताईंनी खचून न जाता दोन्ही मुलींच्या भवितव्याची जबाबदारी स्वीकारली.
‘मुलगा नाही म्हणून काय झाले, माझ्या मुलीच माझा आधार आहेत,’ या विश्वासाने त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. स्वतःच्या दुःखाला मनात दडवून त्यांनी मुलींना उच्च शिक्षण देण्याचा आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचा ध्यास घेतला.
आईचे कष्ट आणि त्याग पाहत दोन्ही मुलींनीही शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहिले होते. आईला पुढील आयुष्यात सुखाचा आधार देण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच नियतीने आईलाही हिरावून घेतले.
आईच्या चितेला मुलीने दिला अग्नी
आई-वडिलांचे छत्र अवघ्या चार वर्षांच्या अंतराने हरपलेल्या या दोन्ही मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला. आईला अखेरचा आधार देण्याऐवजी तिच्या अंत्यसंस्काराची वेळ त्यांच्यावर आली.
मात्र, या दुःखाच्या क्षणीही त्यांनी समाजातील रूढ समजुतींना धाडसी उत्तर दिले. ‘मुलगा नाही म्हणून कर्तव्य कमी होत नाही. आईची लेकरं आम्हीच आहोत,’ या भावनेतून मुलगी शामली चंद्रकांत सुवरे हिने भांडुप येथील स्मशानभूमीत आईच्या चितेला अग्नी दिला.
अंतिम निरोपाच्या वेळी डोळ्यांत अश्रू आणि मनात आईच्या आठवणी असतानाही शामलीने घेतलेला हा निर्णय समाजातील जुन्या रूढींना प्रश्न विचारणारा ठरला.
‘मुलगीही मुलापेक्षा कमी नाही’चा संदेश
मुलीने आईच्या चितेला अग्नी देण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ एका कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय न राहता ‘मुलगी ही मुलापेक्षा कमी नाही’ हा सामाजिक संदेश देणारा ठरला आहे.
आई-वडिलांची सेवा, जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी मुलगा असणे आवश्यकच आहे, या पारंपरिक विचारसरणीला या दोन्ही लेकींनी आपल्या कृतीतून छेद दिला.
उक्षी आणि कोंडये येथील ग्रामस्थांनीही या कठीण प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत मुलींच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
भांडुपच्या स्मशानभूमीत पेटलेली छायाताईंची चिता एका मातेचा अंतिम निरोप ठरली; मात्र त्याच वेळी मुलीही आई-वडिलांचे कर्तव्य आणि संस्कार पूर्ण क्षमतेने निभावू शकतात, हा ठाम संदेश देणारी ठरली. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही या दोन्ही लेकींनी दाखवलेला धैर्याचा हा क्षण समाजाला अंतर्मुख करणारा आहे.

