(देवरुख / प्रतिनिधी)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना महाराष्ट्र राज्य जैव विविधता बोर्ड, महाराष्ट्र शासन यांच्या कडून रुपये २८ लाख ५० हजार ऐवढे अनुदान संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहे. या प्रकल्पामध्ये कोकणातील रानभाज्या आणि जंगली फळे यांचे पोषण मूल्य, उपलब्धता, औषधी गुणधर्म, आर्थिक संधी यावर संशोधन होणार आहे. सदरील संशोधनाचा कालावधी हा तीन वर्षे आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ अंतर्गत मंजूर झालेला हा एकमेव प्रकल्प आहे.
आठवडाभरापूर्विच महाविद्यालयाच्या स. का. पाटील संशोधन केंद्रामधून विज्ञान विषयातील पहिली विद्यावाचस्पती पदवी (डॉक्टर अनिल निकम, रसायन शास्त्र विषयात) मिळविण्याच्या यशानंतर लगेचच मिळालेले हे असेच अभिमानास्पद यश आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ मध्ये डॉक्टर नाईकवाडे यांना राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत अशाच प्रकारच्या संशोधनासाठी रुपये पाच लाख अनुदान मंजूर झाले होते. डॉक्टर नाईकवाडे यांच्यासारखे संशोधक-प्राध्यापक निर्माण करून कोकण विकासाला चालना मिळावी यासाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ कटिबद्ध आहे. डॉक्टर नाईकवाडे यांचे महाविद्यालय व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अध्यक्ष सदानंद भागवत सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.