(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सावर्डे येथील सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या कला महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब म्हणजे महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतींची मुंबई येथे होणाऱ्या प्रतिष्ठित महिला कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.नेहरू सेंटर अंतर्गत असलेल्या आर्ट गॅलरी येथे १० ते १६ मार्च २०२६ या कालावधीत “ महिला कला प्रदर्शन ” चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशभरातील निवडक महिला कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत.या प्रतिष्ठित प्रदर्शनासाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथील कु. सृष्टी कुंभार हिच्या चित्राची तसेच पांचाळ हिच्या शिल्पाची निवड करण्यात आली आहे.

सृष्टी कुंभार हिने सादर केलेले चित्र आधुनिक शैलीत साकारलेले असून त्यामध्ये स्त्रीची भावविश्व, अंतर्मन आणि प्रतीकात्मकता प्रभावीपणे मांडलेली आहे. तर ज्योती पांचाळ हिने साकारलेले शिल्प हे सर्जनशीलता, संतुलन आणि अभिव्यक्ती यांचा उत्तम संगम दर्शवणारे आहे.देशभरातील अनेक कलाकारांमधून या विद्यार्थिनींच्या कलाकृतींची निवड होणे ही सह्याद्री स्कूल ऑफ आर्टसाठी मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
कला क्षेत्रात तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने असे प्रदर्शन महत्त्वाचे ठरतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळते तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळते.या यशामुळे सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून भविष्यातही अशाच प्रकारे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. माणिक यादव तसेच सर्व प्राध्यापकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कलावाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

