(रत्नागिरी /प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत पारेख पेट्रोल पंपासमोर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या कारमधून ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि कार जप्त करण्यात आलेल्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. संशयित मोहम्मदयासीन उमरफारूक पठाण याचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला असून न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी हा आदेश दिला आहे.
संगमेश्वर पोलिसांना २६ मे २०२६ रोजी रात्री राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पारेख पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका संशयित कारमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एमएच-१४-बीके-४१२० क्रमांकाची वॅगनआर कार लॉक अवस्थेत उभी आढळली. प्राथमिक तपासात या वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने आणि पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात संशयिताने कार घटनास्थळीच लॉक करून पलायन केल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेण्यात आली होती. यावेळी २ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच ३ लाख रुपयांची कार, असा एकूण ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी अर्जदार संशयित मोहम्मदयासीन उमरफारूक पठाण याने न्यायालयात धाव घेत वाहनाशी आपला संबंध नसल्याचा दावा केला. मात्र, सरकारी पक्षाने तपासादरम्यान संबंधित वाहन अर्जदाराच्या ताब्यात असल्याची तसेच तो यापूर्वीही प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तपासादरम्यान संशयित फरार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर गुटखा पुरवठा साखळी, मालाचा स्रोत आणि इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी अर्जदाराची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने अर्जदाराचा गुन्ह्याशी प्रथमदर्शनी संबंध असल्याचे नमूद केले. प्रभावी तपासासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या आदेशामुळे संगमेश्वर पोलिसांच्या तपासाला बळ मिळाले असून, गुटखा पुरवठा साखळीतील इतर संबंधितांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

