(भरत माने / साखरपा)
लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्राचे आमदार किरण सामंत यांनी दि. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान दाभोळे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. या दौऱ्यामुळे गावांच्या सर्वांगीण विकासाला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास माजी पंचायत समिती सभापती जया माने यांनी व्यक्त केला.
या दौऱ्यात आमदार सामंत यांनी महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, महावितरण अशा सर्व विभागांचे अधिकारी–कर्मचारी यांना सोबत घेत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. गावागावांतील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच शासकीय योजनांचा लाभ यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी ऐकून तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
शासनाच्या योजना प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रामाणिकपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गावांतील अपूर्ण विकासकामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास नागरिकांना त्यांनी दिला.
आमदार सामंत यांच्या कार्यपद्धतीत दिसणारी तत्परता आणि समस्यांवर दिलेला झटपट न्याय हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. “आदर्श कार्यकुशल आमदार कसा असावा याचे उत्तम उदाहरण किरण सामंत यांनी दाखवून दिले,” असेही माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती विलास चाळके यांनी कौतुक केले.
या दौऱ्यात पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे दाभोळे जिल्हा परिषद गटातील विकासकामांना नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

