(लांजा/ रत्नागिरी)
शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अनोखे आंदोलन केले. रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी खड्ड्यांमध्येच चिखल साचून राहिल्याने आंदोलनकर्त्यांनी थेट बैलजोडीच्या साहाय्याने त्याच खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी करून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. या अनोख्या आंदोलनामुळे लांजा शहरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली.
लांजा शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे सध्या वाहनचालक आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साचत असून वाहनचालकांना अक्षरशः खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत आहे. पादचाऱ्यांनाही चिखलाच्या उडणाऱ्या तुषारांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
बसवेश्वर चौक ते तहसीलदार कार्यालय या मार्गावरील खड्ड्यांमध्ये चक्क चिखल नांगरणी स्पर्धा घेण्यात आली. बैलजोड्यांच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये नांगरणी करण्यात आली. शहरातील रस्ते वाहतुकीसाठी आहेत की शेती करण्यासाठी, असा उपरोधिक सवालच या आंदोलनातून प्रशासनाला करण्यात आला. रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि त्याचा नागरिकांना दररोज सहन करावा लागणारा त्रास याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची ही अनोखी पद्धत वापरण्यात आली. खड्ड्यांत साचलेल्या चिखलात नांगरणी होत असतानाचे चित्र नागरिकांचेही लक्ष वेधून घेत होते.
खड्डे बुजत नाहीत, म्हणून चिखलातच नांगरणी!
लांजा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची चिखल नांगरणी स्पर्धा घेण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याऐवजी केवळ आश्वासनांवर समाधान मानले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलजोड्यांच्या शेतकऱ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लांजा तालुका युवा अधिकारी अभिजित राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, अल्लाउद्दीन नेवरेकर, मोहन तोंडकर, लक्ष्मण मोर्ये, राजू सुर्वे, बाबू गुरव, बाबा धावणे, चंद्रकांत शिंदे, मांडवकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या संयमाचा अंत होण्यापूर्वी कार्यवाहीची मागणी
लांजा शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत असताना प्रशासनाचा कारभार मात्र सुस्त असल्याची टीका यावेळी करण्यात आली. नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थितीत रस्ते देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी करण्याची वेळ नागरिकांवर यावी, हीच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बोलकी टिप्पणी ठरली आहे. अनोख्या आंदोलनामुळे लांजा शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता तरी प्रशासन या ‘चिखलातील इशाऱ्या’ची दखल घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

