(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावरील आरवली घाटात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात भरधाव हायवा डंपर पलटी होऊन चालक जखमी झाला. घाटातील धोकादायक वळणावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सलीम तहिदुल्लाह खान (वय ६२) हा टाटा हायवा डंपर (एमएच-०४ एफपी-१९८७) घेऊन जयगडहून सोदे, ता. खेडच्या दिशेने मुंबई–गोवा महामार्गावरून जात होता. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील आरवली घाटात स्वराज्य पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर अपघात घडला. या ठिकाणी ‘एस’ आकाराचे तीव्र वळण आणि उतार असतानाही चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत डंपर हयगयीने आणि बेदरकारपणे चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी डंपर रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात डंपरचे मोठे नुकसान झाले असून चालक सलीम खान यालाही किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या.
या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. स्थानिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी पोलिस हवालदार अनिकेत अविनाश चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, आरोपी चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

