(रत्नागिरी / वार्ताहर)
आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, सातत्य आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन करसल्लागार तथा भारत शिक्षण मंडळाचे सचिव धनेश रायकर यांनी केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या नाटेकर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मार्गदर्शन करताना धनेश रायकर यांनी व्यक्तिमत्त्व विकास, प्रभावी संवादकौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, वेळेचे व्यवस्थापन आणि करिअरच्या विविध संधी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच टॅली कोर्स आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
टॅली इन्स्टिट्यूटचे नारायण बांदिवडेकर यांनी विद्यार्थ्यांना टॅली कोर्सची उपयुक्तता, अभ्यासक्रम आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनपर कार्यशाळांचा अधिकाधिक लाभ घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.
वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राखी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विनय बावदाने यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

