(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरी शहरातील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय ( महिला विद्यालय) येथे विद्यालयाच्या शतक महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कै .मालतीबाई जोशी आणि कै. बाबुराव जोशी यांनी 1925 साली पाहिलेले स्वप्न म्हणजेच रत्नागिरी येथील सौ.गोदूताई जांभेकर (महिला) विद्यालय. हे विद्यालय सध्या शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असून नवीन येणारे सन 2025 हे या विद्यालयाचे शतक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने विद्यालयात जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी या पहिल्या गटाकरिता १)मालतीबाई जोशी एक आदर्श व्यक्तिमत्व आणि २) वृक्षारोपण काळाची गरज असे विषय ठेवण्यात आले आहेत .तर आठवी ते दहावी या दुसऱ्या गटासाठी १)शिक्षण क्षेत्रातील सोनेरी पान-मालतीताई जोशी आणि २) प्रसारमाध्यमे आणि आजचा विद्यार्थी असे विषय ठेवण्यात आले आहेत .ही स्पर्धा रत्नागिरी येथील सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील श्रीमान भागोजीशेठ कीर सभागृहात गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रत्येक गटातून क्रमांक प्राप्त स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांकाला रोख रक्कम 2,500 स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 2000 स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र , तृतीय क्रमांक रोख रक्कम 1500 स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रमाणपत्र अशी पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी एका शाळेतन प्रत्येक गटात केवळ दोन स्पर्धकांना सहभाग घेता येईल. प्रत्येक स्पर्धकास सात मिनिटे (पाच +दोन) वेळ असेल. स्पर्धेच्या ठिकाणी येण्या जाण्याचा खर्च स्पर्धकाने करावयाचा आहे. स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी निकाल घोषित केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील असे स्पर्धेच्या अटी व नियम ठेवण्यात आले आहेत.
या स्पर्धेच्या अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी गट क्र.१)वाघमोडे सर 94 0 5 13 0 839 आणि गट क्र. २)श्री. कांबळे सर 94 23 80 53 00 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2024 अशी ठेवण्यात आली असून या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन रत्नागिरी येथील सौ. गोदूताई जांभेकर (महिला) विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अनिल चव्हाण आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे यांनी केले आहे.