(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिभेच्या कर्करोगावर उपचार सुरू असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीला अचानक रक्ताच्या उलट्या होण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रांत मुरलीधर शिंदे (वय ६४, रा. परटवणे, रत्नागिरी) यांना जिभेचा कर्करोग होता. त्यांच्यावर वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे उपचार सुरू होते. १० सप्टेंबर रोजी ते आपल्या घरी असताना अचानक त्यांना रक्ताच्या उलट्या होण्याचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने त्यांचे पुत्र वरुण विक्रांत शिंदे यांनी त्यांना पुढील उपचारांसाठी तातडीने रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
१० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.३९ वाजता सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद ११ सप्टेंबर रोजी पहाटे २.४३ वाजता करण्यात आली. याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व संबंधित प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.


