(संगमेश्वर / प्रतिनिधी)
‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून गेली ४३ वर्षे अविरतपणे सर्वसामान्यांची रुग्णसेवा करणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना माफक दरात उपचार देतानाच अनेक प्रसंगी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करणाऱ्या डॉ. यळगुडकर यांच्या सेवाभावी कार्याची पत्रकार संघाने दखल घेतली.
हॉटेल सनराईजच्या सभागृहात झालेल्या या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर यांच्या हस्ते डॉ. यळगुडकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे, डॉ. चंद्रकांत यळगुडकर, त्यांच्या पत्नी सौ. नेहा यळगुडकर, बंधू डॉ. माधव यळगुडकर व त्यांच्या पत्नी सौ. मानसी, ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर आदी उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीतही अखंड रुग्णसेवा
सुमारे चार दशकांपूर्वी कोळंबे येथे वैद्यकीय सेवेची सुरुवात करणाऱ्या डॉ. यळगुडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा दिली. त्या काळात अनेक गावांमध्ये रस्ते, वीज आणि दूरध्वनी यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव होता. अशा परिस्थितीत रात्री-अपरात्री मोटारसायकलवरून शक्य तितके अंतर पार करून, पुढे पावसात आणि चिखलातून वाट काढत ते रुग्णांच्या घरी पोहोचत आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता उपचार करत.
कोळंबेनंतर कडवई, देवरूख आणि संगमेश्वर येथेही त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. रुग्णाकडे उपचारासाठी पैसे आहेत की नाही, यापेक्षा त्याच्यावर तातडीने उपचार करणे याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
गंभीर रुग्णांना स्वतःच्या मोटारसायकलवरून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेणे, पुढील उपचार किंवा प्रवासासाठी पैसे नसलेल्या रुग्णांना स्वतःच्या खिशातून मदत करणे, अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय आला.
‘फिरता दवाखाना’ संकल्पना प्रत्यक्षात
संगमेश्वर तालुक्यात सुमारे चार दशकांपूर्वी पहिली रुग्णवाहिका घेण्याचा पुढाकारही डॉ. यळगुडकर यांनी घेतला. रुग्णवाहिका घेतल्यानंतर स्वतः वाहन चालवत त्यांनी तालुक्यात ‘फिरता दवाखाना’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी त्या काळात केले.
आज वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असला, तरी पैशापेक्षा रुग्णाच्या जीवाला प्राधान्य देणारे डॉ. यळगुडकर यांचे कार्य प्रेरणादायी आणि आदर्शवत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
पत्रकारांच्या आठवणींना उजाळा
पत्रकार समीर सप्रे, संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे सचिव जे. डी. पराडकर, सहदेव बेटकर, मिलिंद चव्हाण, श्रीकृष्ण खातू आदींनी डॉ. यळगुडकर यांच्या कार्याविषयी मनोगते व्यक्त केली. डॉक्टरांना फोन केल्यानंतर कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत, रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी घेतलेली धडपड तसेच रुग्णाला घरी पोहोचण्यासाठी वाहनाची व्यवस्था करताना स्वतःच्या खिशातून केलेली मदत, अशा अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
कुटुंबीयांच्या वतीने बोलताना त्यांच्या भगिनी सौ. माया गोखले यांनी भावनिक आठवण सांगितली. “डॉक्टरांनी आपल्या व्यवसायाला आणि रुग्णसेवेला सर्वाधिक वेळ दिला. मात्र, आम्हा कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी नागरिकांनी डॉक्टरांवर असेच प्रेम कायम ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘या कार्याचे श्रेय पत्नीला’
सत्काराला उत्तर देताना डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांनी आपल्या चार दशकांच्या सेवाकार्याचे श्रेय पत्नी सौ. नेहा यळगुडकर यांना दिले. “त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आजपर्यंत हे कार्य करू शकलो,” असे सांगत त्यांनी पत्नीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. यळगुडकर सामाजिक कार्यातही सक्रिय असून कडवई येथील एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद ते सांभाळत आहेत.
या सन्मान सोहळ्यास व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध मान्यवर आणि डॉ. यळगुडकर यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष उपस्थितींमध्ये डॉ. यळगुडकर यांचे पुतणे डॉ. गणेश यळगुडकर, ज्येष्ठ भगिनी सौ. मीरा कुलकर्णी, त्यांचे पुत्र डॉ. विशाल कुलकर्णी व सौ. प्राजक्ता कुलकर्णी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार अमृत जाधव यांनी केली. श्रीकृष्ण खातू गुरुजी यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करत सूत्रसंचालन केले. पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच तालुक्यातील पत्रकार बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

