(रत्नागिरी)
तालुक्यातील जिंदल कंपनीकडून जयगड खाडीत अनधिकृत भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे खाडी उद्ध्वस्त होऊन भविष्यात किनारपट्टीवरील सुमारे दीडशे गावे व वाड्या पुराखाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबतची तक्रार जयगड-सडेवाडी येथील रहिवाशांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे केली आहे.
जिंदल कंपनीमध्ये वायू गळतीच्या प्रकारानंतर कंपनीने खाडीमध्ये अनधिकृत भराव टाकल्याचा प्रकार पुढे आला आहे. या भराव टाकण्याच्या कामाबाबत जयगड सडेवाडी येथील देवयानी देविदास खाडे यांनी तक्रार केल्याने भराव टाकण्याचे कामही थांबविण्यात आले आहे.
जयगड खाडीच्या मुखावर जिंदल पोर्ट अवैधरीत्या दगड, मातीचा भराव करून अनैसर्गिक जमीन निर्माण करत आहे. या भरावाचे गंभीर दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीवेळी जयगड खाडीचा प्रवाह विरुद्ध दिशेने येत असून, आजूबाजूच्या जमिनीचे दगड मातीचे बंधारे फोडून जमिनीची मोठी धूप होऊ लागली आहे. त्याचबरोबर इतर हिवाळी आणि उन्हाळी ऋतूमध्ये १७५ किलोमीटरवरून वाहत येणाऱ्या बावनदीचा प्रवाह संथ गतीने वाहत असतो.
परंतु, पावसाळ्यात हीच बावनदी आणि जयगड खाडी अतिशय उग्ररूप धारण करते. त्यामुळे रत्नागिरी, गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यांतील सुमारे १५० वाड्या आणि गावे ही पुराखाली येणार असून, हजारो निष्पाप लोकांची जीवितहानी होणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
भरावाचा पंचनामा करण्याची मागणी
जीवितहानी टाळण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे जयगड बंदर निरीक्षक, महसूल विभाग, तलाठी सजा, मंडळ अधिकारी जयगड, जयगड ग्रामपंचायत, सागरी पोलिस स्थानक जयगड, पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन टाकण्यात आलेल्या भरावाचा पंचनामा करण्याची मागणी देवयानी खाडे यांनी केली आहे.