( मुंबई / वृत्तसंस्था )
महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत १,४४० डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार असून, आणखी ६०० डॉक्टरांच्या पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. तसेच सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाइन पद्धतीने आयोजित ‘जन आरोग्य संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद
आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यात येणार असून, त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आबिटकर यांनी सांगितले.
या संवादादरम्यान आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टर रुग्णांशी योग्य पद्धतीने संवाद साधतात का, तसेच रुग्णालयांमध्ये आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत का, याबाबत थेट माहिती घेण्यात आली.
स्थानिक आरोग्य समस्यांवर तातडीने उपाय
स्थानिक पातळीवरील आरोग्य सेवांमधील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. नागरिकांना आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी आणि समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी लवकरच ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना सकस आहार
रुग्णालयातील रुग्णांना दर्जेदार, सकस आणि पोषक आहार मिळावा यासाठी स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक बचत गटांना संधी मिळण्यासोबतच रुग्णांना गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि नागरिकांच्या गरजांनुसार कार्यक्षम करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासोबतच स्थानिक पातळीवरील समस्या तातडीने सोडविण्यावर सरकारचा भर असल्याचे आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

