(देवरूख / वार्ताहर)
देवरूख (सह्याद्रीनगर) येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर दिपक हळबे (वय ५९) यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपून ते घरी होते. दुपारी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने त्यांना डॉ. चोडणकर यांच्या श्री हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
दिपक हळबे हे अत्यंत शांत, मनमिळावू व मदतीस तत्पर स्वभावाचे होते. अनिरुद्ध बापूंचे ते निष्ठावान भक्त होते. समाजकार्य व विविध क्षेत्रांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीचे खजिनदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त झाली. अनेक नातेवाईक, मित्रपरिवार व स्थानिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.