(देवरुख)
26 जानेवारी 2026 रोजी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात सादर होणाऱ्या ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमासाठी देवरुख येथील आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघात या विद्यार्थ्यांचा समावेश झाल्याने देवरुखसह संपूर्ण कोकणासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
दिल्लीतील अंतिम सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या निवड चाचण्यांमधून आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील पी.ओ. कॅडेट केतन रोशन कदम, लीडिंग कॅडेट अनिकेत मंगेश माटे आणि लीडिंग कॅडेट अथर्व अरविंद पवार यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
सलग दुसऱ्या वर्षी कोकणातील चिपळूणचे श्री. सागर अंकुश कुंभार हे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजर म्हणून दिल्ली येथे जबाबदारी सांभाळणार आहेत. ही बाबही कोकणासाठी गौरवाची ठरत आहे.
या यशाबद्दल जिल्ह्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच तालुका व जिल्ह्यातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निवड झालेले हे विद्यार्थी दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा नावलौकिक नक्कीच उंचावतील, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

