(संगमेश्वर / एजाज पटेल)
स्वतःला ‘निर्मल ग्रामपंचायत’ म्हणून ओळख देणाऱ्या फुणगूस ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खाडीपट्ट्यातील प्रमुख आणि गजबजलेल्या फुणगूस गावात आजही सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक, व्यापारी, प्रवासी आणि विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मध्यवर्ती गाव, पण मूलभूत सुविधेचाच अभाव
फुणगूस हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र मानले जाते. गावात बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच एसटी बसथांबा असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिक आणि प्रवाशांची वर्दळ असते. अशा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा असणे अपेक्षित असतानाही ती उपलब्ध नसल्याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
महिला कर्मचाऱ्यालाही सहन करावा लागला मनस्ताप
दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीहून आलेल्या एसटी बसमधील एका सार्वजनिक सेवेतील महिला कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना तातडीने स्वच्छतागृहाची गरज भासली. त्यांनी परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाचा शोध घेतला. मात्र, संपूर्ण गावात अशी कोणतीही सुविधा नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्थानिक महिलांकडे चौकशी केल्यानंतरही “येथे सार्वजनिक स्वच्छतागृह नाही,” असे उत्तर मिळाल्याने त्या आश्चर्यचकित झाल्या. अखेर त्यांना खाजगी स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागला. सार्वजनिक सेवेत कार्यरत महिलेलाच अशी परिस्थिती ओढवत असेल, तर दररोज गावात येणाऱ्या सर्वसामान्य महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी कोणत्या अडचणींना सामोरे जात असतील, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी यापूर्वीही या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. ‘निर्मळ ग्रामपंचायत’ हा केवळ फलकापुरता मर्यादित आहे का, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.
‘निर्मल’च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
गावाच्या प्रवेशद्वारावर ‘निर्मळ ग्रामपंचायत’ असे फलक झळकत असले तरी प्रत्यक्षात सार्वजनिक स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे हा मोठा विरोधाभास असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छतेच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तातडीने सुविधा उभारण्याची मागणी
फुणगूसमध्ये बाजारहाट, बँक, आरोग्य सेवा आणि शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र, स्वच्छ व सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहाची तातडीने उभारणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ, व्यापारी आणि महिला वर्गाकडून होत आहे. प्रशासनाने यापुढे तरी या गंभीर समस्येची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

