(खारेपाटण)
मुंबई–गोवा महामार्ग वरील नडगिवे धुरी भाटलेवाडी बसथांब्याजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय तनिषा पुरुषोत्तम शेट्ये हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा सख्खा भाऊ ऋतुपर्ण शेट्ये (२३) गंभीर जखमी झाला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून संपूर्ण खारेपाटण परिसर हादरून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेले पुरुषोत्तम शेट्ये यांची दोन्ही मुले होळी व शिमगोत्सवासाठी गावी आली होती. मंगळवारी ऋतुपर्ण आपल्या जुन्या अॅम्बेसिडर कारमधून (एमएच ०९ एबी ४३३९) बहिण तनिषासह खारेपाटणहून तळेरेकडे निघाला होता. दरम्यान, नडगिवे धुरी भाटलेवाडी बसथांब्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच ०८ एपी ४२४९) कारची मागून जोरदार धडक बसली.
हा धक्का इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. तनिषा शेट्येचे घटनास्थळीच प्राण गले, तर ऋतुपर्ण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ऋतुपर्णला प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातावेळी ट्रक चालक जेवणासाठी थांबला होता. या दुर्घटनेमुळे शेट्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आनंदी शिमगोत्सवाच्या वातावरणावर शोककळा पसरली आहे.

