(ठाणे)
हळदी समारंभाहून परतताना कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पुलाच्या कठड्याला जोरदार धडकले आणि भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आटगावजवळील संघवी कॉम्प्लेक्स परिसरात शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
अपघातात मयुरेश विनोद चौधरी (२९, रा. तानसा) आणि जयेश किसन शेंडे (२५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल पांडुरंग जाधव (२९, रा. पेंढरघोळ) हा गंभीर जखमी असून त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा झाला अपघात?
पोलिसांच्या माहितीनुसार, तिघेही मित्र शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथील नातेवाईकांकडे हळदी समारंभासाठी गेले होते. शनिवारी सकाळच्या सुमारास ते कारने पेंढरघोळ येथून शहापूरच्या दिशेने निघाले असता आटगावजवळ अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार पुलाच्या कठड्याला धडकल्याने मोटार अक्षरशः चुराडा झाली. कारची डावी बाजू पूर्णपणे कापली गेली होती, त्यामुळे अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येत होती.
लग्नापूर्वीच मयुरेशचा दुर्दैवी अंत
अपघातात मृत्युमुखी पडलेला मयुरेश चौधरी याचा विवाह २ डिसेंबर रोजी होणार होता. घरात लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असताना पहाटेच त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर शोककळा पसरली. अत्यंत सुस्वभावी मयुरेशच्या निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक स्तब्ध झाले आहेत. त्याला एक विवाहित बहीण असून आई-वडिलांचा तोच एक आधार होता.
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

