(खेड / वार्ताहर)
कळंबणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच तथा गावचे प्रथम नागरिक भगवान साळुंके यांना सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘सन क्रिस्टल’ गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भगवान साळुंके यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय काम केले असून, लोकहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे त्यांची खेड तालुक्यात एक कार्यक्षम व सामाजिक भान जपणारे सरपंच म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
यापूर्वीदेखील भगवान साळुंके यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘सन क्रिस्टल’ पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची आणखी एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना कळंबणी बुद्रुक गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्ताराम येरापले तसेच भगवान साळुंके यांचे कुटुंबीय उपस्थित होते. भगवान साळुंके यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल खेड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

