( गुहागर / वार्ताहर )
गुहागर तालुक्यातील पवारसाखरी गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नाट्य व सिनेअभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते प्रमोद ज्ञानदेवराव पवार यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाला राष्ट्रीय स्तरावर मानाची पावती मिळाली आहे. नवी दिल्ली येथे १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना प्रतिष्ठेचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानामुळे गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रमोद पवार यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आपल्या बहुआयामी प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान देत मराठी कलाक्षेत्र समृद्ध करण्याचे काम केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासातील सातत्य, प्रयोगशीलता आणि उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पवारसाखरीच्या मातीतून सुरू झालेला प्रमोद पवार यांचा कलाप्रवास राष्ट्रीय सांस्कृतिक व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागातून आलेल्या कलाकाराने आपल्या प्रतिभा, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या या यशामुळे गुहागर तालुक्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कला क्षेत्रातील नवोदितांना प्रेरणा मिळाली आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या सन्मानामुळे पवारसाखरी गावाचे आणि संपूर्ण गुहागर तालुक्याचे नाव देशाच्या सांस्कृतिक नकाशावर अधोरेखित झाले आहे. गावच्या मातीतून घडलेला कलाकार देशाच्या सर्वोच्च सांस्कृतिक व्यासपीठांपैकी एका व्यासपीठावर सन्मानित झाल्याने पवारसाखरीसह गुहागर तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रमोद पवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कलाप्रवासातील हा राष्ट्रीय सन्मान कोकणच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा असून, त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत. आई भवानी मातेच्या चरणी त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात येत असून, त्यांच्या कलेचा आणि अनुभवाचा लाभ भविष्यातील पिढ्यांना मिळत राहो, अशी भावना व्यक्त होत आहे.

