(लांजा/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात दारूच्या अंमलाखाली भरधाव वेगाने ट्रेलर वेडावाकडा चालवून सार्वजनिक रस्त्यावर इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकाविरोधात लांजा पोलिसांनी कारवाई केली आहे. रामविजय राम अवध सिंह (वय ५१, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे संबंधित ट्रेलरचालकाचे नाव असून, त्याच्याविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास आरोपी रामविजय सिंह हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर (एमएच ४३ बीपी १६९८) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटातून जात होता. यावेळी तो दारूच्या अंमलाखाली भरधाव वेगाने ट्रेलर वेडावाकडा चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्या या बेदरकार वाहनचालकामुळे सार्वजनिक रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची, तसेच अपघात होऊन दुखापत अथवा नुकसान होण्याची शक्यता होती.
या प्रकाराची दखल घेत लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुयोग रोहिदास वाडकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर अवजड वाहनांचा बेदरकार वेग आणि मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचा प्रकार हा केवळ नियमभंग नसून निष्पाप प्रवाशांच्या जीवाशी खेळ ठरू शकतो. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.


