(चिपळूण /रत्नागिरी)
‘एसबीआय योनो ॲपच्या कार्यालयातून बोलत असल्याचे’ भासवत सायबर भामट्याने चिपळूणमधील ८६ वर्षीय निवृत्त वृद्धाची तब्बल ५ लाख २६ हजार २७९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँक खात्याची माहिती आणि अन्य तपशील मिळवल्यानंतर सायबर गुन्हेगाराने मोबाइलचा गैरवापर करून वृद्धाच्या बचत खात्यातून परस्पर रक्कम वळती केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महालक्ष्मी नगर, खंड, चिपळूण येथील कविश्वर कृष्णाजी बापट (८६) हे या फसवणुकीतील फिर्यादी आहेत. ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत ते घरी असताना त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपण एसबीआय योनो ॲपच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत या व्यक्तीने बापट यांच्याकडून बँक खात्याशी संबंधित माहिती आणि अन्य तपशील मिळवून घेतला. यानंतर मोबाइलचा गैरवापर करून त्यांच्या एसबीआय बचत खात्यातून तब्बल ५,२६,२७९ रुपयांचे व्यवहार करण्यात आले. आपल्या खात्यातील रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर बापट यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी १२ ऑगस्ट रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलिसांकडून सुरू आहे. बँक अधिकारी, ॲपचे प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांकडून गोपनीय माहिती मिळविण्याचे प्रकार वाढत आहेत. OTP, PIN, CVV, UPI PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याची संवेदनशील माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

