(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
भुतेनाका येथील रस्त्यावर अचानक फिट आल्याने बेशुद्ध झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अक्षय शशिकांत आयरे (वय ३०, रा. फणसोप सडा, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी अक्षय आयरे यांना भतेनाका येथील रस्त्यावर अचानक फिट आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, अक्षय यांचे मित्र श्रवण रसाळ यांनी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे भाऊ अलंकार शशिकांत आयरे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. भावाला फिट आल्याचे समजताच अलंकार आयरे यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल गाठले. त्यावेळी अक्षय यांच्यावर अपघात विभागात उपचार सुरू होते. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.२४ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी अलंकार आयरे यांनी दिलेल्या खबरीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १४८/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या अचानक मृत्यूने फणसोप परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


