(चिपळूण /रत्नागिरी)
सावर्डे येथून अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तब्बल चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर आज शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) मुंबई येथून अपहृत मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगी सुरक्षित असून, संबंधित युवकाविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी सावर्डे येथून १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या अपहरणप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना आणि त्यानंतर सावर्डे परिसरात निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी क्यूआरटी पथके तैनात करण्यात आली होती.
दरम्यान, मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस (खेड), सुरेश कदम (लांजा), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि सावर्डेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबविण्यात आली. तांत्रिक तपास आणि विविध ठिकाणी केलेल्या शोधमोहिमेतून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबई गाठून शुक्रवारी मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या युवकाला ताब्यात घेतले. सध्या अल्पवयीन मुलीला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले असून, युवकाविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग गोटे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे, दीपराज पाटील, गणेश सावंत आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.


