(गुहागर)
गुहागर तालुक्यातील असगोली गावातील गौरव अरुण पवार (वय ३९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. गौरव पवार हे ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५.५० वाजता चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन पावले.
प्राप्त माहितीनुसार, गौरव पवार १८ मे २०२५ रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या टेरेसवरून खाली पडले होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. तातडीने त्यांना गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे तब्बल १२ दिवस उपचार सुरू होते. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती ३१ मे रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. चिपळूण पोलिसांनी अ.मृ.रजि. क्र. ००/२०२५ नुसार, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यानंतर संबंधित कागदपत्रे ९ जून २०२५ रोजी गुहागर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून, गुहागर पोलिसांनी आमृ. क्र. १६/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ अंतर्गत ही नोंद घेतली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे असगोली गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून गौरव पवार यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.