(गुहागर)
तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार व अॅनिमीया मुक्त अभियान” सोमवारी, दि. २९.०९.२०२५ रोजी उमराठ येथील श्री नवलाई देवीची सहाण येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले.
अभियानाचे उद्घाटन ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ फित कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले. सभागृहात दिपप्रज्वलन करून शिवरायांची तसेच क्रांती जयोती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पुष्पहाराने सजवून आदरांजली अर्पण करण्यात आली.
आरोग्य उपकेंद्र उमराठच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा आंबेकर यांनी केले. सरपंच जनार्दन आंबेकर यांनी रांगोळी काढणाऱ्या कलाकारांचे तसेच पोषण आहार प्रदर्शन करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांचे कौतुक केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
अभियानात विविध आरोग्य तपासण्या आणि सेवांचा समावेश होता. यात रक्तदाब व मधुमेह तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबीन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिक्लेस आजार व रक्तक्षय तपासणी, डोळे व दात तपासणी, वजन व उंची तपासणी तसेच आयुष्यमान भारत कार्ड व वय वंदना कार्ड KYC करण्यात आले.
महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले, जिथे आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत समुपदेशन करण्यात आले. किशोरवयीन मुलांसाठी पोषण व आरोग्यदायी आहाराबाबत मार्गदर्शन देण्यात आले. उमराठ व उमराठ खुर्दच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बनवलेल्या पाककला आणि पाककृती महोत्सवाचेही प्रदर्शन उत्साहात पार पडले.
अभियान यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, साईस दवंडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या सर्वांचे तसेच सहभागी ग्रामस्थांचे कौतुक करत सरपंच जनार्दन आंबेकर यांनी आभार मानले.

