(गुहागर / सचिन कुळये)
श्रीराम भक्तीचा जागर आणि कोकणच्या पारंपरिक लोककलेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने मौजे नरवण, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे श्रीराम दीपोत्सव मंडळाच्या वतीने ८ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत श्रीराम दीपोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या उत्सवात दीपप्रज्वलन, आरती, पारंपरिक प्रबोधनवादी नमन आणि स्थानिक भजनांचे कार्यक्रम रंगणार असून, परिसरात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण होणार आहे.
२००८ मध्ये स्थापना झालेल्या श्रीराम दीपोत्सव मंडळाचा यंदा १९ वा दीपोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, मंडळाकडून उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
रविवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दीपप्रज्वलन व आरतीने दीपोत्सवाचा प्रारंभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रणवजी पोळेकर आणि श्री. निलेशजी सुर्वे उपस्थित राहणार आहेत. सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आरती होणार आहे.
मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आरती झाल्यानंतर रात्री १० वाजता कोकणच्या पारंपरिक लोककलेचा आविष्कार असलेला प्रबोधनवादी नमनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. साई समर्थ सेवा मंडळ, सळपेेवाडी-गुहागर (चिंद्रावळे) निर्मित आणि साई कलामंच, सळपेेवाडी प्रस्तुत या नमनातून पारंपरिक लोककलेची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आरती आणि त्यानंतर स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्रीराम दीपोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा जोपासण्यासोबतच सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे आणि स्थानिक सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे हा मंडळाचा उद्देश आहे. या चार दिवसांच्या उत्सवात परिसरातील रामभक्त, ग्रामस्थ, महिला मंडळे, तरुण मंडळे आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि दीपोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्रीराम दीपोत्सव मंडळ, नरवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.


