(मुंबई / वृत्तसंस्था)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. महामार्गाच्या कामाचा केवळ आढावा घेण्याऐवजी प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यावर भर द्या, असे स्पष्ट आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोकणातील गणेशोत्सवाची गर्दी लक्षात घेता 31 ऑगस्टपूर्वी कोलेटी, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने यंदाच्या गणेशोत्सवातही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडी आणि रखडलेल्या प्रवासाचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महामार्गाची पाहणी केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
मंत्री भोसले यांनी महामार्गाच्या कामाचा सातत्याने आढावा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. कोलेटी, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील चार उड्डाणपुलांची कामे 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या कामांमुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
20 ऑगस्टपासून कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक
माणगाव बाह्यवळण मार्गाचे कामही वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे. सुमारे साडेसात किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी साडेपाच किलोमीटर अंतरावर एकेरी वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. त्यानंतर उर्वरित कामासाठी 20 ऑगस्टपासून कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान माणगाव बाह्यवळण मार्गावरील रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील बांधकामही वेगाने पूर्ण करून उर्वरित सुमारे दोन किलोमीटर मार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
चिपळूण उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू
चिपळूण येथील मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या आणि मोठ्या उड्डाणपुलाचे कामही वेगाने सुरू आहे. या उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच प्रांत कार्यालयाजवळील भरावाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, चिपळूणचा उड्डाणपूल गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे सध्या अवघड असल्याचे बांधकाम विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात चिपळूण परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली वाढवल्या आहेत. चार उड्डाणपूल पूर्ण करण्याचे लक्ष्य, माणगाव बाह्यवळण मार्गावरील रेल्वे पुलाचे गर्डर आणि एकेरी वाहतुकीचे नियोजन यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास काही प्रमाणात सुकर होण्याची शक्यता आहे.

