(पुणे / वृत्तसंस्था)
रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात पोलिसांना एक महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आला आहे. लोहगड किल्ल्याच्या टेकडीवरून 26 वर्षीय केतनला खाली ढकलताना आपण आरोपी चेतन चौधरीला पाहिल्याचा दावा या साक्षीदाराने केला आहे. घटनेनंतर त्याने चेतनला थेट जाब विचारला असता, आरोपी संतापला आणि गप्प राहण्याचा इशारा देत धमकी दिली की, “तू शांत बस नाही तर तुला सुद्धा किल्ल्यावरून खाली फेकून देईन.” असे साक्षीदाराने आपल्या जबाबात नमूद केले आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 5 हजारांहून अधिक पानांच्या आरोपपत्रात या साक्षीदाराच्या जबाबाचाही समावेश आहे.
साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, तो आपल्या मित्राच्या कुटुंबीयांसोबत लोहगड किल्ला पाहण्यासाठी गेला होता. किल्ल्याच्या पायऱ्या चढत असताना त्याला केतन आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल दिसली. सिया गोयल ही या प्रकरणातील दुसरी आरोपी आहे. त्या दोघांच्या मागून चेतन येत होता. त्यावेळी कडक ऊन असतानाही चेतनने हुडी घातली होती. त्यामुळे त्याचा चेहरा साक्षीदाराच्या लक्षात राहिला. त्याने चेतनला एवढ्या कडक उन्हात हुडी घालण्याचे कारणही विचारले होते.
किल्ल्यावर पोहोचल्यानंतर चेतन मंदिराजवळ बसला. त्यानंतर केतन आणि सिया पुढे जाऊ लागल्यावर चेतन त्यांच्यामागे गेला. साक्षीदाराच्या जबाबानुसार, त्यावेळी पोटात दुखू लागल्याने तो काही काळ तेथून बाजूला गेला. परत आल्यानंतर त्याने सिया चेतनकडे बोट दाखवत असल्याचे पाहिले. त्यानंतर सिया खाली बसली आणि तिने केतनच्या पायाला लाथ मारली. त्याचवेळी मागून धावत आलेल्या चेतनने केतनला डोंगरावरून खाली ढकलल्याचे साक्षीदाराने पाहिल्याचा दावा केला आहे.
घडलेला प्रकार पाहिल्यानंतर साक्षीदाराने धाडस करून चेतनला त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी चेतन संतापला आणि त्याने साक्षीदाराला गप्प राहण्याचा इशारा दिला. तसेच, “तू शांत बस नाही तर तुला सुद्धा किल्ल्यावरून खाली फेकून देईन,” अशी धमकी दिल्याचे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले आहे. या धमकीनंतर तो इतका घाबरला की, त्याने त्यावेळी आपल्या मित्रालाही या घटनेची माहिती दिली नाही. घरी परतल्यानंतर भीतीमुळे त्याला मोठ्या प्रमाणात ताप आणि अंगदुखीचा त्रास झाला. घटनेनंतर पाच दिवसांनी, 23 जून रोजी माध्यमांमधील बातम्या पाहिल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधून आपला जबाब नोंदवला.
दरम्यान, चेतनने घातलेली हुडी तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरल्याचे समोर आले आहे. आणखी एका साक्षीदारानेही ट्रेकदरम्यान चेतनला पाहिल्याचा दावा केला आहे. त्यानेदेखील चेतनला हुडी घालण्याचे कारण विचारले होते. त्यावर चेतनने माफी मागून तेथून निघून गेल्याचे या साक्षीदाराने सांगितले आहे.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी साक्षीदारांच्या जबाबांसोबतच मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि डिजिटल पुरावेही गोळा केले आहेत. सहा मोबाईल फोन, नऊ पेन ड्राइव्ह, बॅकअप, कॉल रेकॉर्ड तसेच सोशल मीडिया खात्यांमधून मिळालेल्या अंदाजे 12 टीबी डिजिटल डेटाची तपासणी करण्यात आली आहे. आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आल्याने फॉरेन्सिक पथक डिलीट केलेले चॅट्स पुन्हा मिळवण्यासाठी काम करत आहे.
तपासादरम्यान आरोपीने आयफोनमधील डेटा हटवणे, चॅट हिस्ट्री साफ करणे आणि डेटा रिकव्हरी रोखण्याचे मार्ग ऑनलाइन शोधल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसोबतच डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांचीही तपास यंत्रणेकडून छाननी केली जात आहे.


