(खानापूर / सांगली)
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत खानापूर येथील नंदा हरिदास त्रिंबके यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अन्य दोन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विटा येथून भिवघाटच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि विजापूरहून मेढ्याकडे जाणारी एसटी बस रेणावी घाटात समोरासमोर आली. दोन्ही बसची जोरदार धडक झाल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. धडक इतकी भीषण होती की, काही प्रवासी बसमध्ये अडकले.
विटा येथून एक एसटी बस भिवघाटकडे जात होती. तर दुसरी एसटी बस विजापूरहून विटा मार्गे सातारा जिल्ह्यातील मेढ्याकडे निघाली होती. रेणावी घाटातील वळणाच्या परिसरात दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी विटा आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जवळपास १८ प्रवासी जखमी; काहींची प्रकृती गंभीर
या अपघातात प्राथमिक माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १८ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
रेणावी घाटात नेमका अपघात कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे.

