( पुणे )
पुण्यातील गाजलेल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानीला पोलिसांनी अटक केली असून, तपासात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मात्र या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुढे येत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अशातच माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पार्थ पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली दोन महत्त्वाची पत्रे समोर आणली असून, त्यावरून या प्रकरणात पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पुण्यातील पत्रकार भवन येथे माध्यमांशी बोलताना विजय कुंभार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली. “मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचा सहभाग नाही, असे सांगत मूळ विषयाकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आज सादर करण्यात आलेली दोन पत्रे ही शासन दरबारातील अधिकृत कागदपत्रे आहेत. या पत्रांवरून पार्थ पवार यांचा या घोटाळ्यात सहभाग स्पष्टपणे दिसून येतो,” असा आरोप कुंभार यांनी केला.
विजय कुंभार यांनी सांगितले की, जून 2021 मध्ये कंपनी स्थापन झाल्यानंतर पार्थ पवार यांनी एक पत्र दिले होते. या पत्रामध्ये शीतल तेजवानीच्या सुरू असलेल्या पत्रव्यवहाराला पाठिंबा द्यावा आणि संबंधित जमीन शीतल तेजवानीच्या नावावर करावी, असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. पार्थ पवार यांनी दिलेल्या या दोन पत्रांवरून त्यांचा मुंढवा जमीन घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट होते, असेही कुंभार म्हणाले.
“आता तरी पोलिसांनी सर्व आरोपींवर कठोर कारवाई करत सखोल चौकशी करावी. दोषींना पाठीशी घालण्याऐवजी सत्य समोर आणावे आणि भविष्यात असा प्रकार पुन्हा घडणार नाही, यासाठी ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

