(पेण)
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेणमधील मोसीन मुजावर या युवकाने सोशल मीडियावर देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व धर्मीयांनी मोसीन मुजावरविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शहरात मोर्चेही निघाले.
या प्रकरणात आरोपी मोसीन मुजावर याला पेण पोलिसांनी सोमवारी (१२ मे) पहाटे नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे.
३ एप्रिल रोजी मोसीन मुजावरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून भारतविरोधात चिथावणीखोर मजकूर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये त्याने म्हटले होते की, ‘इंडिया के रुल्स की तहेस नहेस हो गई है, संभलके रहो हमारे पास तो तलवारे, बॉम्ब, मिसाईल सब रेडी है, देख रहा है ना इराण सब लेके बैठा है! जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनिट मे उडा देगा वो, एक दिन इंडिया भी हमारा होगा, पुरा कब्जा हमारा होगा, और हम मस्त दबा के मारेंगे’ अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पेण शहरात धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती असताना मोसिन मुजावर याने दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोसिन पेणचा असला तरी मुंबईला राहतो आणि त्याचे वडील अरब देशात नोकरी करतात. मोसिनच्या पोस्टनंतर पेण तालुक्यासह रायगडमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर ९ मे रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास त्याच्यावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शनिवारी पेणमध्ये सर्वपक्षीय निषेध रॅली काढून मोसिन मुजावरचा निषेध करण्यात आला होता.
या पोस्टनंतर आयुष किरण शहा यांनी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष साईराज कदम यांच्या माध्यमातून ९ मे रोजी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीसांनी या पोस्टची पडताळणी करून मोसीन मुजावरविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५३(१)(ख) व ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग आणि हेड कॉन्स्टेबल अजिंक्य म्हात्रे, अमोल म्हात्रे, सुशांत भोईर, संतोष जाधव, राजा पाटील, प्रकाश कोकरे, सचिन वासकोटी, गोविंद तलवरे यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोसीनचा माग काढत त्याला अटक केली. सद्यःस्थितीत पुढील तपास पेण पोलीस करत आहेत.