(कणकवली / वार्ताहर)
कणकवली-फोंडाघाट मार्गावर भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. डामरे-कानडेवाडी स्टॉपनजीक कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. या अपघातात कारखाली अडकून गंभीर जखमी झालेल्या चालक मैत्रेय ऊर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय 28, रा. फोंडाघाट बाजारपेठ) याचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सिव्हिल इंजिनिअर असलेला मैत्रेय पेडणेकर बुधवारी रात्री कारने कणकवलीहून फोंडाघाटच्या दिशेने जात होता. डामरे-कानडेवाडी स्टॉपनजीक त्याचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचालक कारखाली अडकला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रात्री सुमारे 9.45 वाजता डामरे येथील दर्शन सावंत यांनी फोंडाघाट येथील विजय हळदिवे यांना फोन करून कानडेवाडी स्टॉपजवळ कारला अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर विजय हळदिवे हे मित्र सिद्धेश पावसकर यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळलेली आणि चालक कारखाली अडकलेला दिसून आला.
स्थानिकांनी तत्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने कारखाली अडकलेल्या मैत्रेयला बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री सुमारे 11.40 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मैत्रेय पेडणेकर हा सिव्हिल इंजिनिअर असून कणकवली आणि ओरोस परिसरात बांधकामाची कामे घेत होता.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश बच्चाव, उपनिरीक्षक प्रीतेश पाटील, हवालदार विनोद चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी विजय गोविंद हळदिवे यांनी पोलिसांना खबर दिली असून, अपघाताची पुढील कार्यवाही सुरू आहे.
मैत्रेय सदैव आनंदी आणि मित्र परिवारामध्ये सर्वांचा लाडका “गोट्या” या नावाने परिचित होता. बाल गोपाळ मंडळाच्या विविध उपक्रमात त्याचा वावर होता. फोंडाघाट मधील जुनी- जाणती पान व्यापारी पेढीचे राजेश पेडणेकर यांचे ते सुपुत्र होत. घटनेची बातमी कळतात त्याच्या चाहत्यांनी त्यांचे घरी एकच गर्दी केली. तर फोंडाघाट बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली अंत्ययात्रेत विविध स्तरातील हितचिंतक मित्रपरिवार आणि ग्रामस्थ तसेच बालगोपाळ मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याच्या पश्चात आई -वडील, आजी, बहीण, चुलते, चुलत भाऊ इत्यादी मोठा परिवार आहे.
तरुण आणि होतकरू अभियंत्याचा अपघाती मृत्यू झाल्याने फोंडाघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

