(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
बदलती जीवनशैली, धावपळीचे दैनंदिन जीवन, अवेळी आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे विविध अवयव निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून अवयव प्रत्यारोपणाची गरजही वाढत असून, विशेषतः किडनी प्रत्यारोपणाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत किडनी प्रत्यारोपणाच्या संख्येत तब्बल 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात किडनी प्रत्यारोपणाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती झोनल ट्रान्सप्लांटेशन कोऑर्डिनेशन कमिटीच्या संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आली आहे.
देशात अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेइतके नसले तरी गेल्या पाच वर्षांतील किडनी प्रत्यारोपणाची वाढती संख्या सकारात्मक चित्र दर्शवते. यामुळे अवयवदान चळवळीला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी व्यक्त केली.
देशात 73,646 रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत
देशभरात अवयवदान दिन साजरा होत असताना किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची मोठी संख्या समोर आली आहे. देशात तब्बल 73,646 रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे किडनीची मागणी आणि उपलब्ध अवयव यांच्यातील मोठी दरी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. केंद्र सरकारने 27 जुलै 2026 रोजी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 2021 ते 2025 या पाच वर्षांत एकूण 6,225 किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. मात्र, किडनी मिळण्याची प्रतीक्षा करत असताना याच कालावधीत महाराष्ट्रातील 133 रुग्णांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात दरवर्षी वाढते किडनी प्रत्यारोपण
महाराष्ट्रातील किडनी प्रत्यारोपणाची संख्या गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढली आहे. 2021 मध्ये राज्यात 928 किडनी प्रत्यारोपण झाले होते. 2022 मध्ये ही संख्या 1,056, 2023 मध्ये 1,305, 2024 मध्ये 1,461, तर 2025 मध्ये 1,475 वर पोहोचली. म्हणजेच 2021 च्या तुलनेत 2025 मध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या संख्येत 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, प्रत्यारोपणाची संख्या वाढत असतानाही देशभरातील 73 हजारांहून अधिक रुग्णांची प्रतीक्षा यादी चिंताजनक आहे. अवयवदान वाढविण्याची आणि उपलब्ध अवयवांचे योग्य पद्धतीने प्रत्यारोपण करण्याची गरज या आकडेवारीतून अधोरेखित होते.
पाच वर्षांत किडनीच्या प्रतीक्षेत 133 रुग्णांचा मृत्यू
किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करताना महाराष्ट्रात 2021 मध्ये 50 रुग्णांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये 9, 2023 मध्ये 30, 2024 मध्ये 29 आणि 2025 मध्ये 15 रुग्णांनी किडनीच्या प्रतीक्षेत जीव गमावला. पाच वर्षांत एकूण 133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, 2021 मध्ये किडनीच्या प्रतीक्षेत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 50 होती. 2025 मध्ये ती 15 वर आली. म्हणजेच 2021 च्या तुलनेत 2025 मध्ये प्रतीक्षा यादीतील मृत्यूचे प्रमाण सुमारे 70 टक्क्यांनी घटले आहे. प्रत्यारोपणाची वाढती संख्या आणि प्रतीक्षा यादीतील मृत्यूत झालेली घट ही काहीशी दिलासादायक बाब असली, तरी अवयवदानाचा वेग वाढविणे ही अजूनही मोठी गरज आहे.
किडनी प्रत्यारोपणाची वाढती संख्या वैद्यकीय क्षेत्रातील सकारात्मक बदल दर्शवत असली, तरी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे, मृत्यूनंतर अवयवदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे आणि अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया अधिक व्यापक करण्याची गरज आहे. अवयवदानाची चळवळ मजबूत झाल्यास प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते.

