(मुंबई)
महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असताना भाजपमध्ये इनकमिंगचा सिलसिला वेगाने सुरू आहे. सध्या प्रचार सभांना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सर्वच नेते राज्यभर प्रचारात व्यस्त आहेत. अशाच वातावरणात काँग्रेसला मोठा धक्का देणारी घडामोड घडली आहे.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी हजारो पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. भाजपच्या प्रभाग क्रमांक 36 मधील ढोबमणे सभागृहातील मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात परमार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
15 राज्यांतील दीड लाख पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ही देशातील सफाई कामगार क्षेत्रातील मोठी संघटना असून 15 राज्यांत सुमारे 1.5 लाख पदाधिकारी कार्यरत आहेत. महाराष्ट्रातच या संघटनेचे जवळपास 50 हजार पदाधिकारी विविध जिल्ह्यांत काम करत आहेत. परमार यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं मानलं जात आहे.
भाजपने केवळ मतं नाही, पाठिंबा दिला: फडणवीस
या पक्षप्रवेशावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आता पूर्णपणे भाजपमय झाली आहे. इतर पक्ष फक्त मतं मागतात, मात्र भाजप सफाई कामगारांच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे परमार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघटना भाजपमध्ये आली आहे. सफाई कामगार क्षेत्रात ही संघटना अनेक वर्ष लढा देत होती. वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला प्रतिनिधित्व देणारी ही मोठी संघटना आज भाजपच्या झेंड्याखाली आली आहे. त्यामुळे संपूर्ण समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र आहे.”
फडणवीसांच्या कामामुळे निर्णय: गोविंदभाई परमार
गोविंदभाई परमार म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळे प्रभावित होऊन देशभरातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आमच्या समस्या मांडणारा कोणीच नव्हता. केंद्र सरकारच्या योजनांमुळे आम्हाला आधार मिळाला. आता भाजपमध्ये ‘सफाई कामगार सेल’च्या माध्यमातून देशभर काम करू.”
सफाई कामगारांसाठी भाजपची ठोस भूमिका
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “1997 मध्ये महापौर असताना लाडपागे समिती अंतर्गत सुशिक्षित सफाई कामगारांच्या मुलांना नोकऱ्या देण्याचं काम भाजपने केलं. मुख्यमंत्री झाल्यावर सफाई कामगारांच्या हक्कांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. 2022 मध्ये जीआर काढून तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला. श्रम साफल्य योजनेअंतर्गत पक्की घरं, मालकी हक्क देण्याचे निर्णय घेतले आहेत. नागपूरमध्ये काम सुरू आहे. भाजपच्या झेंड्याखाली आल्यानंतर तुम्हाला कधीही पश्चात्ताप होणार नाही.”
या पक्षप्रवेशामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठं बळ मिळालं असून राजकीय समीकरणं आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

