(पुणे)
प्रियकर सतत मानसिक त्रास देत असल्याने प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी गुंडाविरोधी पथकाकडून तिघांसह महिलेला आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं आहे. बालाजी उर्फ बाळू मचक लांडे असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. रेखा विश्वंभर भातनासे असे आरोपी प्रेयसीचे नाव असून तिच्या अल्पवयीन मुलीला देखील हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे. या हत्या प्रकरणाचा आधी अपघात आहे असा बनवा रचण्यात आला होता. पण गुंडाविरोधी पथकाने हा बनाव उघड केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या बालाजीचा अपघात झाल्याचा बनाव रचला गेला होता. त्यानंतर त्याला वासीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. दरम्यान, आरोपी रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांच्यासह इतरांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी नावं सांगितली होती. ही बाब लक्षात येताच पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी समांतर तपास करण्याबाबत सूचना दिल्या. गुंडाविरोधी पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांकडून आजूबाजूचे अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तोच धागा चिखलीतील दुर्वांकुर सोसायटीपर्यंत पोहोचला.
पोलिसांकडून तपासणी सुरु असताना सोसायटीच्या लिफ्टमध्ये काही रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. फ्लॅट नंबर ३०३ मध्ये अल्पवयीन मुलगी दिसली. तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो दाखवला आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे नाव बालाजी उर्फ बाळू मचक लांडे असे असल्याचं समोर आलं आणि तो बीडमधील दिंदृडचा रहिवाशी असल्याचं तपासात समोर आलं आहे.
तसेच मुलीची आई रेखा विश्वभंर भातनासे आणि इतर चार साथीदारांनी हत्या केल्याचे कबूल केलं आहे. रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांना ताब्यात घेतलं आहे. तर इतर तीन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम बीडला रवाना झाली आहे.
दि. १७ जानेवारी रात्री पावणेनऊ वाजता प्रेयसी रेखाने प्रियकर बालाजीच्या हत्येचा कट रचला. आधीच रुमध्ये काही मित्रांना बोलवण्यात आलं होतं. तिथं बालाजी येताच त्याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केलं. अपघात असल्याचा बनाव रचून त्याला वायसीयम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला. अखेर पोलिस मूळ सूत्रधार असलेल्या रेखापर्यंत पोहोचले आणि घटनेचे बिंग फुटले. प्रियकर बालाजी हा मानसिक त्रास देत असल्याने रेखाने त्याची हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.