( देवरुख / वार्ताहर )
संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी देवरुख येथील सृजन सायन्स सेंटरमध्ये उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तसेच ‘इन्स्पायर अवॉर्ड मानक’ या राष्ट्रीय विज्ञान उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेला शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, केंद्रप्रमुख करंबेळे यांच्यासह तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात मेंगाळ सर यांनी आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.
शशिकांत त्रिभुवने यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विविध राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. ‘इन्स्पायर अवॉर्ड मानक’सारख्या राष्ट्रीय मंचामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वैज्ञानिक कल्पना आणि नवकल्पना सादर करण्याची संधी मिळते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहित करून त्यांचा जास्तीतजास्त सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
सदानंद भागवत यांनी सृजन सायन्स सेंटरचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक प्रयोग आणि उपक्रमांची सुविधा सेंटरमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक सत्रात किमान एकदा, म्हणजेच वर्षातून दोन वेळा सृजन सायन्स सेंटरला भेट देऊन वैज्ञानिक प्रयोगांचा अनुभव घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यानंतर साधन व्यक्ती म्हणून योगेश मुळे, अजिंक्य नाफडे, संदीप जाधव आणि अमृत मेंगाळ यांनी ‘इन्स्पायर अवॉर्ड मानक’ योजनेचा उद्देश, तांत्रिक बाबी, विद्यार्थ्यांचे नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया तसेच सहभागासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची सविस्तर माहिती दिली. शिक्षकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचेही यावेळी निरसन करण्यात आले.
तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय विज्ञान उपक्रमात सहभागी व्हावे आणि त्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळावे, यासाठी शिक्षकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले.

