(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यातील देहूजवळील भंडारा डोंगरावर एकाकी सोडण्यात आलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. मात्र, ज्या ठिकाणी जन्मदात्यांनी तिला सोडून दिले, त्याच चिमुकलीसाठी आता शेकडो कुटुंबे आणि हात मदतीसाठी पुढे आले आहेत. या प्रकरणाला भावनिक वळण देणारे डॉ. प्रकाश कोयाडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चिमुकलीबाबतची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
ती नेमकी कोण आहे, इथे कशी पोहोचली? तिला कोणी आणून येथे सोडले की ती मुलं चोरणाऱ्या टोळीच्या तावडीत सापडली? अशा अनेक प्रश्नांनी पोलिसांसह सर्वांनाच अस्वस्थ केले होते. देहूजवळील भंडारा डोंगरावर एकाकी अवस्थेत आढळलेल्या या दीड वर्षांच्या चिमुकलीला पिंपरी चिंचवड येथील YCM हॉस्पिटलच्या बालरोग विभागात दाखल करण्यात आले. इतक्या लहान मुलीला अशा अवस्थेत पाहून पोलीस आणि डॉक्टरही भावुक झाले.
चिमुकलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉ. प्रकाश कोयाडे यांनी तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावेळी तिची ओळख, ती डोंगरावर कशी पोहोचली आणि तिचे आई-वडील कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाहता पाहता ही पोस्ट तब्बल ५५ लाख लोकांपर्यंत पोहोचली.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मदत व्हावी आणि मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेता यावा, यासाठी डॉ. प्रकाश कोयाडे यांनी चिमुकलीबाबत माहिती असलेल्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन करत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
या पोस्टनंतर अवघ्या दीड दिवसात डॉ. कोयाडे यांच्याकडे ३०० ते ४०० मेसेज आणि फोन आले. “आम्ही या बाळाला दत्तक घ्यायला तयार आहोत,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. विविध संस्था आणि कुटुंबांनीही या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली. या प्रतिसादाने भारावून जात डॉ. कोयाडे यांनी, “आपण म्हणतो जग आधीसारखं राहिलं नाही, पण अशा घटना घडतात तेव्हा कळतं की जगात अजूनही खूप चांगली माणसं आहेत. लोकांच्या या भावनेने मन भरून आलं,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, सोशल मीडियावरील या आवाहनानंतर अखेर चिमुकलीचे आई-वडील स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. मुलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याने त्यांनी तिला अशा प्रकारे डोंगरावर सोडून दिल्याचे समोर आले. पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर आई-वडिलांनी मुलीला भंडारा डोंगरावर अशा प्रकारे एकटं सोडण्यामागचं कारण सांगितलं. “कोणीतरी दानशूर किंवा चांगलं कुटुंब तिला घेऊन जाईल आणि तिचा चांगला सांभाळ करेल,” या आशेने त्यांनी अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला देहूजवळील ओसाड भंडारा डोंगरावर एकाकी सोडल्याचे सांगितले. गरिबी आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे.
पती मजूर असून पत्नी गृहिणी आहे. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगत होते. आपल्या चिमुकलीला दारिद्र्याचे चटके सोसावे लागू नयेत, या विचारातून त्यांनी रविवारी (६ सप्टेंबर) मुलीला भंडारा डोंगरावर एकटी सोडल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अजय शिवशंकर यादव (वय २३) आणि खुशबू अजय यादव (वय २२, दोघे रा. वासुली, मूळ उत्तर प्रदेश) या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयात उपचार सुरू असताना तैनात महिला पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरांच्या टीमने या चिमुकलीची स्वतःच्या मुलीप्रमाणे काळजी घेतली. तपास अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या या प्रेमळ वागणुकीमुळे अवघ्या दीड वर्षांच्या त्या निष्पाप जीवाला आई-वडिलांची आठवणही आली नाही. सोमवारी सायंकाळी ती पूर्णपणे ठणठणीत आणि सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी घेऊन जाण्यात आले होते.
आता या चिमुकलीच्या आयुष्याचा पुढचा टप्पा काय?
चिमुकलीचे आई-वडील समोर आल्यानंतर पोलिसांकडून कायदेशीर तसेच वैद्यकीय तपासणी सुरू आहे. बाळाला दत्तक देणे ही न्यायालयीन आणि संस्थात्मक प्रक्रियेतून होणारी बाब असल्याने इतर कोणत्याही व्यक्तीला थेट बाळ सोपवता येत नाही. याबाबत डॉ. कोयाडे यांनी, “काही कायदेशीर प्रक्रियांमुळे सध्या सर्व गोष्टी सांगता येणार नाहीत, पण एक गोष्ट नक्की… ते लहान बाळ अत्यंत सुरक्षित आहे आणि ते योग्य आणि सुरक्षित हातातच जाणार,” अशी खात्री दिली आहे.
सध्या चिमुकली सुरक्षित असून, वैद्यकीय आणि डीएनए (DNA) तपासणीनंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार तिची बालगृहात रवानगी केली जाणार असल्याचे समोर येत आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चिमुकलीचा शोध घेण्यास मदत झाली आणि तिच्या आयुष्याला सुरक्षित दिशा मिळाली. या संपूर्ण प्रकरणात संवेदनशीलतेने भूमिका बजावणारे डॉक्टर आणि पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


