(कोलकाता / वृत्तसंस्था)
पत्नीची तब्येत ठीक नसल्याने तिला एकटीला सोडून परदेशात नोकरीसाठी जाण्याची इच्छा नव्हती. मात्र, प्रवास टाळण्यासाठी एका ५६ वर्षीय व्यक्तीने चक्क विमान अपहरणाची खोटी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलकाता-मुंबई एअर इंडिया विमानातील स्वच्छतागृहात हायजॅकची धमकी देणारी चिठ्ठी आढळल्याने ११ नोव्हेंबर रोजी विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पार्थ प्रतिम नंदी याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार दहशतवादी कृत्य नसून वैयक्तिक कारणातून केल्याचे समोर आले आहे.
११ नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईकडे जाणारे एअर इंडियाचे AI 2772 हे विमान उड्डाणाच्या तयारीत होते. विमानात १०५ प्रवासी होते. सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी विमानातील एका क्रू मेंबरला स्वच्छतागृहात हस्तलिखित चिठ्ठी आढळली. त्यामध्ये विमानाचे अपहरण होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. तसेच सकाळी ११ वाजून १० मिनिटांचा उल्लेखही करण्यात आला होता. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.
धमकीची माहिती मिळताच वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) सतर्क केले. सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे उड्डाण रोखण्यात आले आणि ते स्वतंत्र आयसोलेशन बे येथे हलवण्यात आले. त्यानंतर विमानातील सर्व १०५ प्रवाशांना खाली उतरवून त्यांच्या हँडबॅगची तपासणी करण्यात आली. चेक-इन सामानही उतरवून त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. सुरक्षा पथकांनी संपूर्ण विमानाची झडती घेतली; मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर विमान अपहरणाची धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
या संपूर्ण सुरक्षा तपासणीमुळे विमानाचे उड्डाण सात तासांहून अधिक काळ लांबले. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. नियोजित वेळेपेक्षा बराच उशीर झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी हे विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या विलंबामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, धमकीच्या चिठ्ठीचा तपास करताना सुरक्षा यंत्रणांनी पार्थ प्रतिम नंदी याला संशयावरून ताब्यात घेतले. तो पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील रहिवासी आहे. चिठ्ठीवरील हस्ताक्षर आणि संशयिताच्या हस्ताक्षराची तुलना करण्यात आली असता दोन्ही जुळल्याने त्याच्यावरील संशय बळावला. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी त्याला ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील चौकशीत नंदी याने विमानात धमकीची चिठ्ठी ठेवल्याची कबुली दिली.
चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीनुसार, तो स्वतः आणि त्याची पत्नी कर्करोगाने ग्रस्त आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्याला आधी मुंबईला आणि त्यानंतर आफ्रिकेत जायचे होते. मात्र, पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने तिला एकटीला सोडून जाण्याची त्याची इच्छा नव्हती. याच मानसिक तणावातून विमानात हायजॅकची धमकी देणारी चिठ्ठी ठेवल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


