(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरुख परिसरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईला वेग देत देवरुख पोलिसांनी खालची आळी ते बौद्धवाडी मार्गावरील पुलावर गांजा ओढणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार (दि. ५ जानेवारी २०२६) रोजी सायंकाळी करण्यात आली.
सुकृत श्रीश भोसले (वय ३४, मूळ रा. कांदिवली, मुंबई; सध्या रा. खालची आळी, देवरुख, ता. संगमेश्वर) असे अटकेत घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. देवरुख पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल तेजस देशमुख यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे ७.१० वाजण्याच्या सुमारास खालची आळी ते बौद्धवाडी या मार्गावरील पुलावर भोसले हा गांजा ओढत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भोसले याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला गांजा कोणाकडून मिळाला, याबाबतचा तपास देवरुख पोलीस करीत आहेत.

