(देवळे / प्रकाश चाळके)
व्यवसाय शिक्षण उपक्रमांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळे नं. १ येथील विद्यार्थ्यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी देवळे गावातील गणपती मूर्ती निर्मिती कारखान्यांना क्षेत्रभेट दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्थानिक व्यवसायाची प्रत्यक्ष माहिती मिळण्याबरोबरच त्यामागील मेहनत, कौशल्य आणि कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यवसायांविषयी कुतूहल आणि आवड निर्माण करणे, तसेच व्यवसायाच्या प्रत्यक्ष स्वरूपाची ओळख करून देणे हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता. क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘मुलाखत’ या माध्यमातून गणपती मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला.
मूर्ती निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य, लागणारा वेळ व मेहनत, उत्पादन खर्च, विक्री प्रक्रिया तसेच व्यवसायातून मिळणारे उत्पन्न याबाबत विद्यार्थ्यांनी कारागिरांना विविध प्रश्न विचारले. कारागिरांनीही मूर्ती निर्मितीच्या विविध टप्प्यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील माहितीबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून स्थानिक व्यवसायाची ओळख झाली. तसेच विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, संवादकौशल्य, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि मुलाखत घेण्याचे कौशल्य विकसित होण्यास मदत झाली. व्यवसाय आणि त्यामागील श्रम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.


