भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांमध्ये अल्फाबेटने सर्वाधिक मूल्यवान कंपनीचा मान मिळवला आहे. सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीचे मूल्य ४.२ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीच्या तुलनेत अल्फाबेटच्या मूल्यामध्ये सुमारे ९८ टक्क्यांची वाढ झाली आहे. याउलट, याच कालावधीत मायक्रोसॉफ्टच्या मूल्यामध्ये १७ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे अल्फाबेटने मायक्रोसॉफ्टला मागे टाकले आहे. यादीत सत्या नडेला दुसऱ्या आणि संजय मेहरोत्रा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन आणि गुगल क्लाउडचे प्रमुख थॉमस कुरियन यांनीही पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे.
पहिल्या पाच कंपन्यांमध्ये मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या मूल्यवाढीने विशेष लक्ष वेधले आहे. संजय मेहरोत्रा यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीचे मूल्य तब्बल १,१७४ टक्क्यांनी वाढून १.४ ट्रिलियन डॉलर झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील वाढत्या विस्तारामुळे मेमरी चिप्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा फायदा मायक्रॉनला झाला आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणावर मेमरी चिप्सची आवश्यकता असते आणि मायक्रॉन या चिप्सच्या निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.
या यादीतील पहिल्या पाच कंपन्यांचे एकत्रित मूल्य ९.१ ट्रिलियन डॉलर असून, ते संपूर्ण यादीतील कंपन्यांच्या एकूण मूल्याच्या सुमारे ६१ टक्के आहे. पहिल्या दहा कंपन्यांचे एकत्रित मूल्य १०.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे.
२०२६ च्या हुरुन यादीत प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वतंत्र उद्योग क्षेत्र म्हणून स्थान देण्यात आले आहे. या क्षेत्रातील १८ कंपन्यांचे एकत्रित मूल्य २२७ अब्ज डॉलर आहे. यादीतील २०० कंपन्यांपैकी १०३ कंपन्या एआय तंत्रज्ञानावर आधारित आहेत किंवा त्यांच्या व्यवसायात या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. या कंपन्यांचे एकूण मूल्य १०.७ ट्रिलियन डॉलर असून, संपूर्ण यादीतील कंपन्यांच्या मूल्याच्या सुमारे ७१ टक्के वाटा त्यांचा आहे.
स्टार्टअप क्षेत्रात कर्सर (Cursor) या कंपनीने ६० अब्ज डॉलर मूल्यासह यादीतील सर्वाधिक मूल्यवान स्टार्टअपचा मान मिळवला आहे. पहिल्या दहा स्टार्टअपपैकी सात कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आहेत. या सर्व दहा कंपन्यांची मुख्य कार्यालये अमेरिकेत आहेत. उद्योग क्षेत्रानुसार पाहता, सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्रातील सर्वाधिक ५३ कंपन्यांचा या यादीत समावेश आहे. त्याखालोखाल आर्थिक सेवा क्षेत्रातील ३१ आणि आरोग्य क्षेत्रातील २१ कंपन्यांना स्थान मिळाले आहे.
भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांच्या भौगोलिक वास्तव्यात अमेरिकेचे वर्चस्व दिसून येते. यादीतील २३६ अधिकाऱ्यांपैकी १७७ जण अमेरिकेत वास्तव्यास आहेत. संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ब्रिटनमध्ये प्रत्येकी १५, तर सिंगापूरमध्ये नऊ अधिकारी राहतात. शहरनिहाय आकडेवारीत सॅन फ्रान्सिस्को ४० अधिकाऱ्यांसह आघाडीवर आहे. दुबईमध्ये १५, तर पालो ऑल्टो आणि लंडनमध्ये प्रत्येकी १३ अधिकारी वास्तव्यास आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात ९१ भारतीय वंशाचे अधिकारी आहेत.
या अधिकाऱ्यांच्या मूळ भारतीय राज्यांचा विचार करता महाराष्ट्र २२ जणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील २१ आणि तामिळनाडूतील १५ जणांचा या यादीत समावेश आहे. जगभरातील नामांकित कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या या अधिकाऱ्यांपैकी अनेकांनी आपले उच्च शिक्षण भारतातून पूर्ण केले आहे. यादीतील सुमारे ५८ टक्के अधिकाऱ्यांनी पदवीचे शिक्षण भारतात घेतले आहे. यामध्ये आयआयटी दिल्ली आघाडीवर असून, तेथून शिक्षण घेतलेले १५ अधिकारी यादीत आहेत. मुंबई विद्यापीठातील १२ आणि आयआयटी मद्रासमधील ११ जणांचाही समावेश आहे.
पदव्युत्तर शिक्षणासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. या विद्यापीठातून १९ अधिकाऱ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या एकूण १७६ अधिकाऱ्यांपैकी सुमारे ७३ टक्के जणांनी अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांमधून पदवी मिळवली आहे.
महिला नेतृत्वाच्या बाबतीतही या यादीत वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२४ मध्ये १२ महिलांचा समावेश होता, तर २०२६ मध्ये ही संख्या १६ झाली आहे. या महिलांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांचे एकत्रित मूल्य ६९९ अब्ज डॉलर आहे. अरिस्ता नेटवर्क्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री व्ही. उल्लाल या यादीतील आघाडीच्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या कंपनीचे मूल्य २०८ अब्ज डॉलर आहे. त्यानंतर व्हर्टेक्स फार्माच्या रेश्मा केवलरमानी आणि यूएस बँकॉर्पच्या गुंजन केडिया यांचा क्रमांक लागतो.
वयाच्या बाबतीतही या यादीत मोठी विविधता दिसून येते. मर्कर (Mercor) या कंपनीचे २३ वर्षीय सहसंस्थापक आदर्श हिरेमठ आणि सूर्या मिधा हे यादीतील सर्वात तरुण सदस्य आहेत. दुसरीकडे, सिम्फनीएआयचे संस्थापक रोमेश वाधवानी हे ७९ वर्षांचे असून सर्वात ज्येष्ठ उद्योजक ठरले आहेत. यादीतील सर्व सदस्यांचे सरासरी वय ५५ वर्षे आहे.
भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांच्या जागतिक यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आता बदलत असल्याचे हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी म्हटले आहे. पूर्वी भारतीय प्रतिभावंत परदेशात गेल्यानंतर त्याला ‘ब्रेन ड्रेन’ म्हणजेच देशातील बुद्धिमान मनुष्यबळाचे स्थलांतर असे संबोधले जात होते. मात्र, आता हेच अधिकारी जगातील आघाडीच्या कंपन्यांचे नेतृत्व करत असून भारत आणि जागतिक बाजारपेठ यांच्यात कौशल्य, व्यवसाय आणि संधींचे नवे संबंध निर्माण करत आहेत. या बदलाला त्यांनी ‘ब्रेन ब्रिज’ असे संबोधले आहे.
HSBC इंडियाचे आंतरराष्ट्रीय संपत्ती आणि प्रीमियर बँकिंग विभागाचे प्रमुख संदीप बत्रा यांनीही भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांच्या यशाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या अधिकाऱ्यांची कामगिरी केवळ परदेशातील यशापुरती मर्यादित नसून, ते भारत आणि जगातील व्यवसाय, संधी तसेच परस्पर संबंध अधिक मजबूत करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


