(रायगड / खोपोली)
खोपोलीतील शिळफाटा येथे गुरुवारी दुपारी खासगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या बसने रिक्षा, कार, पिकअप आणि दुचाकींसह आठ ते नऊ वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दोघे गंभीर, तर १२ जण जखमी झाले असून, त्यांपैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एका दुकानालाही फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली ट्रॅव्हल्सची खासगी बस सुरतहून प्रवाशांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने जात होती. शिळफाट्याजवळ अचानक बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरील अनेक वाहनांना बसने जोरदार धडक दिली. या धडकेत काही वाहने नुकसानग्रस्त झाली.
अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, हेल्प फाउंडेशनचे बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात पोहोचवले. जखमींवर खोपोली नगरपालिका रुग्णालय, डॉ. जाखोटिया हॉस्पिटल आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींपैकी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर क्रेनच्या मदतीने बस रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अत्यंत रहदारीच्या मार्गावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे खोपोली परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : ईषा पुंडलिक जाधव (वय २२, रा. परळी, ता. सुधागड), प्रफुल्ल नथुराम ढवाळकर (वय ३८, रा. लौजी, खोपोली, ता. खालापूर), संदीप फ्रान्सिस मुकणे (वय ३२, रा. कुणे गाव, लोणावळा), विपुल श्रीकृष्ण पाथ्रोडकर (वय २९, रा. भिसेगाव, कर्जत), सुहास शरद भालेराव (वय ३५, रा. पनवेल), स्वप्निल सुनील पवार (वय ३६, रा. लक्ष्मी नगर, खोपोली), सोमनाथ चंदर पवार (वय ३६, रा. सावरोली, खालापूर), वरद अनंत देशमुख (वय १३, रा. खोपोली फाटा, खालापूर), कुणाल प्रवीण दळवी (वय २८, रा. मोगलवाडी, खोपोली), सुरेश विरप्पा बिरादार (वय ३०, रा. पाटणकर चौक, क्रांतीनगर, खोपोली), प्रीतम वाघमारे (वय ३०, रा. वावोशी, खालापूर) आणि आनंद अरुण गोसावी (वय ३६, रा. उक्रुळ, ता. कर्जत).


