(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक दशकांपासून समाजहिताचा ध्यास घेत ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे संगमेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. चिपळूण येथील चैतन्य आर्ट संस्थेच्या वतीने त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच आषाढी वारी महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षानिमित्त चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या भव्य रंगमंचावर हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सांस्कृतिक वैभव, वारकरी परंपरेचा गजर आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष दिमाख लाभला. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल भक्तीच्या सुरेल वातावरणात झाली. सुप्रसिद्ध गायिका सौ. उत्तरा भागवत-साडविलकर आणि गायक श्री. बापट यांनी आपल्या सुमधुर आवाजात विठ्ठलाच्या अभंगांसह भक्तिगीतांचे सादरीकरण करत उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. “जय जय रामकृष्ण हरी” आणि “जय हरी विठ्ठल” या नामघोषांनी सभागृह दुमदुमून गेले.
यावेळी चिपळूण येथील महिला मंडळाने सादर केलेली पारंपरिक पालखी मिरवणूक आणि दिंडी हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा विषय ठरला. फुगडी, जात्यावर दळण, पारंपरिक खेळ आणि वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर समाज, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा मान्यवरांना राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांच्यासह यशवंत कुलकर्णी, विनायक कुलकर्णी (कराड, जि. सातारा), राघो ग. अंबावकर (चिपळूण), सुभाष बुरटे (पेठमाप, चिपळूण) आणि अनंत साळवी (पोफळी, चिपळूण) यांचा समावेश होता.
पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, आकर्षक स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या सोहळ्यास चैतन्य आर्ट संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम निर्मळ, उपाध्यक्ष दिलीप संकपाळ, सचिव अरविंद जोगळे यांच्यासह प्रकाश देशपांडे, बापू काणे, डॉ. प्रणव माळी, दामिनी माळी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. आषाढी वारीच्या भक्तिमय सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी आणि पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यासाठी चिपळूण व परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या समस्या सातत्याने समाजापुढे मांडत लोकहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सत्यवान विचारे यांना मिळालेला हा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ हा केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून संगमेश्वर तालुक्याच्या पत्रकारितेचा आणि संपूर्ण तालुक्याच्या सामाजिक जाणीवेचा सन्मान असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

