(संगमेश्वर / एजाज पटेल)
तालुक्यातील फुणगूस खाडीभागातील मांजरे (कोपरखरी) येथे महावितरणच्या विद्युत रोहित्रातून तांब्याचे वायडिंग चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३५ किलो वजनाचे कॉपर वायडिंग लंपास केले असून, यामुळे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल दिलीप नाके हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जाकादेवी शाखेत प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात मेढे, जाकादेवी आणि उक्षी परिसरातील रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. मांजरे गावातील कोपरखरी येथे महावितरणचा २५ केव्हीए क्षमतेचा (डीटीसी क्रमांक ४१९००२६) रोहित्र काही काळापासून नादुरुस्त अवस्थेत होता.
याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या रोहित्रातील मौल्यवान तांब्याचे वायडिंग चोरून नेले. ही घटना २४ नोव्हेंबर २०२४ ते ४ मे २०२६ या कालावधीत घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरट्यांनी कोणतीही परवानगी न घेता अत्यंत शिताफीने रोहित्रातील साहित्य काढून नेले.
दरम्यान, नियमित तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. यानंतर स्वप्निल नाके यांनी वरिष्ठांना माहिती देत संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून ४ मे २०२६ रोजी दुपारी ३:४० वाजता अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात विद्युत साहित्य चोरीच्या घटना वाढल्या असून, चोरट्यांचा रोख आता नादुरुस्त तसेच कार्यरत रोहित्रांकडे वळल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. चोरीचा कालावधी मोठा असल्याने यामागे संघटित टोळीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

